हॉटेल, रिसॉर्ट सुरु करायला परवानगी ; या नियमांचे करावे लागणार पालन….

नाशिक (प्रतिनिधी) : कंटेन्मेंट झोन वगळता राज्यातील इतर भागात हॉटेल, लॉज, रिसॉर्ट आदी निवासी सुविधा सुरु करण्याबाबत पर्यटन संचालनालयामार्फत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सरकारकडून हा निर्णय “मिशन बिगीन अगेन”च्या अंतर्गत घेण्यात आला आहे. याआधी राज्य सरकारने इतर सुविधांना शंभर टक्के परवानगी दिली होती. मात्र हॉटेल, लॉज किवा रिसॉर्ट यांना मात्र काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली होती. त्यानंतर आता या सुविधा सुरु करण्याचा निर्णय पर्यटन संचालनालयाकडून घेण्यात आला आहे.

यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत. सर्व प्रवाशांची आगमनस्थळी थर्मल-गनमार्फत तपासणी करावी. लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा. सेवा पुरवताना सोशल डिस्टंसिंग पालन करण्यात यावे. प्रवाशांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. आवश्यक ठिकाणी हॅन्ड-सॅनिटायजर ठेवावेत. डिजिटल माध्यमातून व्यवहार करण्यावर भर द्यावा. पैशांची देवाणघेवाण करतांना काळजी घ्यावी. अशा सुचानांचा त्यात समावेश आहे.

नियमावली:

एकापेक्षा जास्त लिफ्ट असल्यास वेगवेगळ्या लिफ्टचा वापर करावा.

पर्यटकांसाठी असणाऱ्या वाहनांची वेळोवेळी स्वच्छता करावी.

पर्यटकांची ट्रॅव्हल हिस्ट्री, हेल्थ हिस्ट्री इत्यादी बाबींची माहिती असणारा आरोग्यविषयक अर्ज भरून घेण्यात यावा.

क्यू-आर कोडसारख्या प्रणालीतून स्वयं चेक-इन सारख्या बाबी शक्य असल्यास सुरू कराव्यात.

पर्यटकांना बुकलेट किंवा व्हिडिओच्या माध्यमातून काय करावे किंवा काय करू नये याची माहिती पुरवावी.

पर्यटकांनी स्वतः सामानांची ने-आण करावी.

लहान मुलांसाठीचा प्ले-एरिया बंद राहील.

मागवलेली ऑर्डर रूमच्या बाहेर ठेऊन रूम सर्व्हिस संपर्करहीत असावी.