हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्यापासून मित्राने वाचवला जीव!

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील देवळालीकॅम्प येथे आनंद ससाणे या‌ तरूणावर बिबट्याने हल्ला केला. मात्र, त्याचा मित्र बाळू भवार याने प्रसंगावधान दाखवल्यामुळे आनंदचा जीव वाचला. यादरम्यान आनंदच्या पायाला दुखापत झाली आहे.

लहवितजवळील एअरफोर्समध्ये मंगळवारी (दि.२७ ऑक्टोबर) रोजी सकाळी आनंद ससाणे व त्याचा मित्र बाळू भवार हे दोघे कामावर निघाले होते. बिबट्याच्या पायाच्या ठस्याकडे त्यांचे लक्ष गेले. दरम्यान झुडपात लपून बसलेल्या बिबट्याने आनंद वर झेप  घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाळूने  आनंदला बाजूला ओढले. व बिबट्याच्या हल्ल्यातून वाचवले. गेल्या आठवड्यात याच गावाच्या माळवाडी परिसरात सुनील काणे यांच्यावरही बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यामुळे नागरिकांकडून बिबट्याचे हल्ले  रोखण्यासाठी वन विभागाने उपाय योजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे.