हरवलेल्या ८ वर्षीय मुलाचा सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांकडून शोध

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील सिडको परिसरातील राणेनगरमधील ८ वर्षीय हरवलेल्या मुलाचा पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोध घेतला. मयुरउद्दिन शेख यांचा मुलगा समीर (वय८) घराजवळ खेळत असताना अचानक हरवला. पालकांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. म्हणून, याबाबत शेख यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यावरून गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कमलाकर जाधव व श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक पी.एन.परदेशी, शिपाई आदिनाथ बारगजे, विजय जगताप यांनी सोशल मीडियावर समीरचा फोटो व्हायरल केला. या तपासातून अवघ्या २ तासात समीरला शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी मुलाला शोधून पालकांच्या स्वाधीन केले.