नाशिक (प्रतिनिधी) : शहरात वाहनांच्या अपघातांचे प्रमाण हे वाढतच चालले आहे. मात्र, आडगाव परिसरामध्ये एका पायी चालणाऱ्या ५० वर्षीय इसमाला स्वीफ़्ट चालकाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.२७ डिसेंबर) रोजी संशयित आरोपी हा आपल्या ताब्यातील स्वीफ़्ट कार (क्रमांक एमएच १५ जीएल ७३७१) रस्त्याने अविचाराने भरधाव वेगात चालवत होता. दरम्यान, रस्त्यावर पायी चालणारे नंदू सुकदेव वाघ ( वय ५०, रा.गजविनायक रो.हाउस क्रमांक ०६, दत्तनगर आडगाव) यांना या स्वीफ़्ट चालकाने जोरदार धडक दिली. या अपघातात वाघ यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे बंधू चंदू सुकदेव वाघ (वय ४५) यांनी या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.