सेतू, महा ई-सेवा व आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यास परवानगी

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रातील सेतू केंद्र,  महा-ई-सेवा केंद्र व आधार नोंदणी केंद्र सामाजिक अंतर राखुन तसेच कोरोना रोखण्याबाबतच्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणीस बांधील राहून सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

या संदर्भात जिल्हा माहिती कार्यालयाशी बोलताना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले की, सद्यस्थितीत कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणेकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. परंतु कोरोनच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच विविध औद्योगिक व व्यवसायिक आस्थापना सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुषंगाने सेतू केंद्र , महा-ई- सेवा केंद्र व आधार नोंदणी केंद्र शासनाकडील निर्देशाप्रमाणे सामाजिक अंतर राखून पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे व तशी जिल्हा प्रशासनाची खात्री झाली आहे. असेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी या संदर्भात बोलताना सांगितले.

सेतू केंद्र व महा-ई-सेवा केंद्रामध्ये संचालकांनी काही बाबींची खबरदारी घ्यावयाची आहे. त्यात प्रामुख्याने, सेतू केंद्र , महा-ई-सेवा केंद्र व आधार नोंदणी केंद्रातील सामग्री,  उपकरणे व परिसराचे निर्जंतुकीकरण करून घेणे आवश्यक आहे. सेतू केंद्र , महा-ई-सेवा केंद्र व आधार केंद्रातील केंद्र चालक व इतर ऑपरेटर यांनी स्वच्छता विषयक वारंवार साबणाने हात धुणे, सॉनिटायझर वापरणे इत्यादी सर्व निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. सेतू केंद्र, केंद्रामध्ये काम करताना ऑपरेटर नाक, तोंड व डोळ्यांना स्पर्श होणार नाही याची दक्षता घेतील. तसेच केंद्रातील ऑपरेटर व येणाऱ्या नागरिकांनी पूर्णवेळ तोंडावर मास्क परिधान करावा. केवळ फोटो काढतानाच मास्क काढण्यास परवानगी देण्यात यावी. सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व आधार केंद्रात येणाऱ्या नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेचे पालन केले पाहिजे, असे आवाहन करताना सुरज मांढरे म्हणाले,  सेतू केंद्र , महा-ई- सेवा केंद्र य आधार केंद्र व्यवस्थापकांचा टेबल, ऑपरेटर यांच्या बसण्याच्या जागे दरम्यान शारीरीक अंतर किमान 6 फूट सुनिश्चित करण्यात आले आहे . जास्त गर्दी टाळण्यासाठी  केंद्रामध्ये अपॉइंटमेंटशिवाय येण्याची नागरीकांना परवानगी दिली जाऊ नये. नागरीकांना सामाजिक अंतर निश्चित करण्यासाठी योग्य अंतरासह जेथे उपयुक्त असेल तेथे मोकळ्या हवेत बसण्यास प्रोत्साहित करावे. असेही निर्देश सेतू, महा-ई-सेवा केंद्र, आधार केंद्र चालकांना देण्यात आले आहेत.

ज्या नागरिकांना किंवा कर्मचाऱ्यांना खोकला, ताप व कफ , श्वासोच्छवासाच्या अडचणी इत्यादी लक्षणे आढळल्यास त्यांनी सेतू केंद्र,  महा-ई-सेवा केंद्र व आधार केंद्रात न येणेबाबत फलक लावण्यात यावेत. प्रत्येक सेतू केंद्रे,  महा-ई-सेवा केंद्र , व आधार नोंदणी केंद्र युआयडीएआयने पुरविलेल्या टेम्पलेटनुसार नागरीकांसाठीचे पत्रक दर्शनी भागात लावावेत. नोंदणी केंद्र ऑपरेटरनी कोव्हीड -१९ च्या हॉटस्पाॅट ला जाणे किंवा अशा भागातून प्रवास करण्यास सक्त मनाई राहिल. प्रतिबंधित क्षेत्रातील प्रतिबंधित गावे व भागात सेतू केंद्र, महा-ई- सेवा केंद्र व आधार नोंदणी केंद्र सुरू करणेत येऊ नयेत. जिल्ह्यामध्ये सेतू केंद्र, महा-ई- सेवा केंद्र व आधार नोंदणी केंद्रात शिबीरे घेऊ नयेत. सेतू केंद्र , महा-ई – सेवा केंद्र , व आधार नोंदणी केंद्रात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्कॅनिंग करावे व त्याची दैनंदिन नोंद ठेवावी. वरिल नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत व्यक्ती अथवा संस्था यांनी शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानून पुढिल कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सेतू, महा-ई-सेवा व आधार केंद्र चालकांनी व सर्व संबंधितांनी या निर्देशानुसार तात्काळ कार्यवाही करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.