सिन्नरला आठवडाभरात दोन पोल्ट्रीतून ४२ हजार अंडे चोरीस

नाशिक (प्रतिनिधी): पोल्ट्री व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात अंडीचोरांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठवडाभरात दोन पोल्ट्रीमधून सुमारे ४२ हजार अंडी चोरीला गेल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी तत्काळ या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पोल्ट्री व्यावसायिकांमधून होत आहे.

तालुक्यातील दुशिंगवाडी शिवारात वावी येथील राजेंद्र लक्ष्मीनारायण भुतडा यांच्या ओम पोल्ट्री फार्मच्या अंडी साठवलेल्या गोदामाची जाळी तोडून अज्ञात चोरट्यांनी सोमवारी (दि. ८) रात्री बारा ते मंगळवारी (दि. ९) पहाटे चारच्या दरम्यान सुमारे २१ हजार अंडी चोरून नेली. ७०० ट्रेमध्ये ही अंडी साठवलेली होती.

सकाळी पोल्ट्री व्यवस्थापक उठल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. या घटनेमुळे भुतडा यांचे सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यातही वावी- घोटेवाडी रस्त्यावर नवनाथ यादव यांच्या पोल्ट्री फार्ममधून ७०० ट्रे अंडी चोरीस गेले होते. या घटनेचा तपास लागत नाही, तोच आठवडाभरात दुसरी घटना घडल्याने अंडी उत्पादकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

तालुक्याच्या पूर्वभागातील वावी, कहांडळवाडी, दुशिंगपूर, मलढोण, घोटेवाडीशेजारील संगमनेर तालुक्यातील चोरकौठे, चिंचोली गुरव, पारेगाव आदी भागात पोल्ट्री व्यवसाय सुरू आहे. अनेकांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. कोरोनाकाळ व उन्हाळ्यातही अंड्यांचे भाव टिकून असल्याने चोरट्यांची वक्रदृष्टी आता अंड्यांवर पडली अाहे. माहितगारांनी ही चोरी केली असावी, असा अंदाज पोल्ट्री व्यावसायिकांमधून वर्तवला जात आहे. दुसंगवाडी शिवारात गोडाऊनची जाळी तोडून चोरट्यांनी अंडी लंपास केली.