सिडकोवासियांची अन्यायाची भावना दूर ; येथील घरांना मनपाची परवानगी…

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील पंचवटी, नाशिक रोड, सातपूर, पूर्व व पश्चिम विभागातील नागरिकांना जिन्याचे लँडिंग, पॅसेज व जिना टप्पा क्षेत्राचे शुल्क पुनर्बांधणीत लागत नाही. त्यामुळे सिडको परिसरातील नागरिकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली होती. तसेच सिडको परिसर हा कामगार वसाहत असल्याने येथील नागरिकांना या नियमानुसार १ लाख रुपये भरावे लागत होते. त्यामुळे कष्टकरी जनतेवर अन्याय होत होता. हा अन्याय दूर करण्यासाठी स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधींनी मनपाकडे प्रस्ताव सदर केला होता. तो प्रस्ताव अखेर मंजूर झाला आहे.

नाशिक मनपा क्षेत्रात जिन्याचे लँडिंग,जिना पॅसेज क्षेत्राचे चटई क्षेत्र मूल्यांकन व आकारणीत निःशुल्क म्हणून गणना करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती त्या अनुषंगाने सिडको प्रशासना बरोबर पत्रव्यवहार करून नवीन नांदेड व नवीन औरंगाबाद मधील सिडकोच्या स्कीम महापालिकेकडे हस्तांतरित केल्यानंतर केलेल्या नियमांचा अभिप्राय घेऊन नियमांच्या आधारे मूल्यांकन प्रीमियम शुल्क माफ असल्याने त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेला देखील ते माफ करता येईल असे सिडकोने अभिप्राय दिल्याने स्थायी समिती समोर सादर करण्यात आलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आली असल्याची माहिती स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी दिली.