सिडकोतील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारांवर गुन्हा दाखल…

नाशिक (प्रतिनिधी) : सिडको परिसरातील शिवशक्तीनगर येथे भूमिगत विद्युत तारेतून विजेच्या धक्क्याने एका तरुणाने प्राण गमावला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात ठेकेदार तसेच जेसीबी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (दि.२९) शिवशक्तीनगर येथे भूमिगत विद्युत तारेच्या धक्क्याने धीरज जगताप या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. यानंतर नागरिकांनी याप्रकरणी आंदोलन करून दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती.

सिडको परिसरात या विद्युत तारांमुळॆ अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे या तारा भूमिगत करण्याची मागणी नागरिक तसेच राजकीय पक्षांकडून वारंवार करण्यात येत होती. मात्र, वीज वितरण व महापालिका यांच्यापैकी ही कामगिरी कोण बजावेल हा वाद निर्माण झाल्याने हा प्रश्न कायम होता. परंतु, २००८ मध्ये सिडको परिसरातील नगरसेवक निधीतून या कामाचा अखेर श्रीगणेश झाला. या माध्यमातून अनेक विद्युत तारा भूमिगत करण्यात आल्या पण, याच भूमिगत तारा आता नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहेत.