सावत्र बापाने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि…

नाशिक (प्रतिनिधी) : मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता प्रसार बघता आपल्या बाळाला काही होऊ नये यासाठी बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या विवाहित मुलीवर सावत्र पित्याने अतिप्रसंग केला. यावेळी  सावत्र पित्याने नवजात बाळाला ठार मारण्याची धमकी दिल्याने मुलीला चीड येऊन तिने सावत्र बापाचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना नाशिकरोडमधील गोरेवाडी परिसरात घडली. याप्रकरणी संबंधित महिलेला नाशिकरोड पोलीसांनी अटक केली.  

यामध्ये अधिक माहिती अशी की मृत सुभाष बोराडे (५५, रा. खंडू गायकवाड मळा) हा इसम आपली सावत्र मुलगी काजल शिंदे (वय १९, रा. ठाणे) हिच्यावर वारंवार अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करायचा. मंगळवारी (दि.14) रात्री पुन्हा त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काजलने प्रतिकार केला असता त्याने “तुझ्या मुलाला जिवंत ठेवणार नाही.” अशी धमकी दिली. त्यावेळी काजलने रागाच्या भरात येऊन त्याचा गळा दाबून खून केला. या घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी पंचनामा करून काजल ला अटक केली.