सातपूर परिसरात वर्दळीच्या ठिकाणी चाकूने वार करून लूट!

नाशिक (प्रतिनिधी) : मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आय.टी.आय ब्रिजच्या वळणावर खुटवडनगर परिसरात चाकूने जबर वार करून सोन्याची चैन आणि हातातली अंगठी लुटून नेल्याची घटना समोर आली आहे.

अंबडलिंकरोड परिसरात राहणारे दोघे भाऊ रिक्षा घेऊन कामानिमित्त सातपूरकडे जात असतांना आय.टी.आय. ब्रिज च्या वळणावर समोरून दुचाकीवर ३ अनोळखी इसम रिक्षाला आडवे आले. तिघांच्याही हातात धारदार चाकू होते. या तिघांनी दोघा भावांना रिक्षातून खाली उतरवले. त्यातील एकाने मोठ्या भावाच्या कानावर वार करून त्याला जखमी केले. दोघेजण दुसऱ्या भावाला ३५ ते ४० फुट लांब ओढत घेऊन गेले आणि त्याच्या पोटावर तसेच डाव्या हातावर आणि पाठीवर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले आणि सोन्याची चैन व दोन अंगठ्या काढून नेल्या. एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल या चोरांनी चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक निंबाळकर हे पुढील तपास करत आहेत.