सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी, लग्न सोहळा व अंत्ययात्रेला मात्र मुभा

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी सर्व प्रकारचे मोर्चे, मिरवणुका मेळावे, धरणे, विविध प्रकारचे आंदोलने, शोभायात्रा, धार्मिक दिंडी यांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र कार्यक्रम घेण्याची गरज भासलीच तर पोलिस आयुक्तांकडे लेखी अर्ज केल्यास सर्व बाबी तपासून परवानगी देण्यात येईल, असे आदेश पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी काढले आहेत. लग्न समारंभ, राजकीय पक्षांचे कार्यक्रम व अंत्ययात्रा यांना यात मुभा देण्यात आली आहे.

या आदेशात असे म्हटले आहे की, कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेचे असल्यास त्यासाठी पोलिस आयुक्तालयात अर्ज करावा लागेल. रहदारीला अडथळा होऊ नये याची उपायोजना करण्यासाठी वाहतूक विभागाकडेही अर्ज द्यावा लागणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर पोलिस आयुक्त हे महापालिका, शहर वाहतूक शाखा व संबंधित पोलिस ठाणे यांचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन परवानगीबाबत निर्णय देतील.

नाशिक महानगरपालिकेची भरारी पथके करणार लग्न सोहळा ते हॉटेल्स, रेस्टॉरंट, बारपर्यंतची तपासणी
कोरोनाचे रुग्ण पून्हा वाढू लागले आहेत. गुरूवारी पुन्हा एकदा २०० रूग्ण आढळल्याने पालिका आयुक्त कैलास जाधव हे अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी सर्व विभागीय अधिकाऱ्यांना आदेश काढून फिजिकल डिस्टनन्सचे पालन करावे तसेच गर्दी होणाऱ्या ठिकाणी भेट देत कठोर कारवाईची तंबी दिली. मुख्य म्हणजे, विभागीय अधिकाऱ्यांनी भरारी पथके तयार करून लग्न सोहळ्यापासून तर हॉटेल्स, बार व रेस्टॉरंटमध्ये सायंकाळी भेटी देवून तपासणी करावी, असेही आदेश दिले आहे.
काेराेनावरील लसीचे जानेवारीत वितरण सुरू झाल्यानंतर मात्र, अाता जणू काही शहरात काेराेना राहिलाच नाही अशा अविर्भावात नागरिकांचे वर्तन सुरू झाले. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावले जात नसल्याने काेराेना रूग्ण पून्हा वाढू लागले अाहे.

पोलिस परवानगी अनिवार्य
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी पोलिस प्रशासनाने अधिसूचना काढली असून कुठलेही कार्यक्रम घेताना पाेलिसांची परवानगी अनिवार्य अाहे. नागरिकांनी शासन नियमांचे काटेकोर पालन करावे . – दीपक पांडेय, पोलिस आयुक्त