सराफ बाजार व दहीपूल परीसातील कामांची महापौरांनी केली पाहणी

नाशिक (प्रतिनिधी): सराफ बाजार व दहीपूल परिसरात सध्या विकासकामे सुरु आहेत. सराफ बाजार व दहीपूल परिसरात सुरू असलेल्या या कामाची पाहणी महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्यासमवेत मनपा नगरसेवक व मनपा अधिकाऱ्यांनी केली. सराफ बाजार ओकाची तालीम येथे पावसामुळे वारंवार पाणी साठवून  इतर वेळी  दुर्गंधी परिसरात  पसरत असल्याने यादृष्टीने कायम स्वरूपी उपाययोजना करण्याची  मागणी नागरिकांनी केली होती.

त्या अनुषंगाने महापौर सतीश नाना कुलकर्णी यांनी त्या भागात जाऊन पाहणी केली. त्या परिसरात असणाऱ्या सुलभ शौचालयामुळे पावसाचे पाणी अडत असते त्यामुळे मोठ्याप्रमाणावर अडचण निर्माण होते तरी ते सुलभ शौचालय काढून टाकण्याची मागणी येथील व्यावसायिकांनी केली. यादृष्टीने याठिकाणी महापौरांनी अधिकाऱ्यांशी त्याबाबत चर्चा करून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. याच बरोबर  दहीपूल  परिसरातही मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठत असल्याने  व सरस्वती नाल्यावर  त्याचा भार येत असल्याने दहीपूल,नेहरू चौक व परिसरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी यावेळी करण्यात आली तसेच या कामाला गती देऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सूचना स्मार्ट सिटीचे अधिकारी प्रकाश थविल यांना देण्यात आल्या.

या पाहणीच्या वेळी मा.महापौर सतीश नाना कुलकर्णी यांच्या समवेत मा.अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टेकर, नगरसेविका वत्सला खैरे, वैशाली भोसले, आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्पना कुटे, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे,उपअभियंता एस.ई बच्छाव, स्मार्ट सिटी कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल आदी उपस्थित होते.