सराफ बाजारातून दिवसाढवळ्या व्यापाऱ्याचे २० लाख लांबवले!

नाशिक (प्रतिनिधी) : काल (दि.२९) दुपारच्या सुमारास सराफ बाजारात तब्बल २० लाख रुपयांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दुपारच्या सुमारास सोन्याचे व्यापारी सोने खरेदी करण्यासाठी सराफ बाजारात आले असता त्यांनी दुचाकीवर ठेवलेली २० लाख रुपयांची बॅग चोरांनी लांबवली. याप्रकरणाविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भरत मधुकर पवार असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. सातपूरमधील अशोकनगर येथे त्याचं सोने-चांदीचे दुकानं आहे. त्यासंदर्भात सोने खरेदीसाठी सराफ बाजारात आले होते. यावेळी त्यांच्याकडे २० लाख रुपये असलेली बॅग होती. सराफ बाजारातील मारुती मंदिरासमोर त्यांनी दुचाकी उभी केली. त्यावेळी दुचाकीच्या हॅन्डलला लावलेली पैशांनी भरलेली बॅग चोरांनी पळवून नेली. त्यानंतर पोलिसांनी परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची तपासणी केली असता ठोस माहिती मिळाली नाही.