सराईत गुन्हेगार गटऱ्याला सापळा रचत पोलिसांनी केली अटक!

नाशिक (प्रतिनिधी) : कुख्यात गुन्हेगार सुनील गायकवाड उर्फ गटऱ्यावर चोरी,  झोपड्यांची जाळपोळ, कोयत्याचा धाक दाखवत केलेली लूट इत्यादी गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे पोलीस गटाऱ्याच्या मागावर असून, अखेर त्याला गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

पोलीस आयुक्त दिपक पांडे व उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी पथक तयार करून गटऱ्याला पकडण्याचे आदेश दिले. त्यानुसार गटऱ्या शनिवारी (दि.२८) रोजी पेठरोडवरील नवनाथनगरला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच, त्या स्वरूपाने सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. दरम्यान गटऱ्याने सर्व गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली.

त्यानुसार, सिन्नर येथे खंबाळे परिसरात झोपड्यांची जाळपोळ, तिबेटियन मार्केटमध्ये घरफोडी, कोयत्याचा धाक दाखवत ११ ऑक्टोबरला केलेली लूट इत्यादींचा समावेश आहे. गटऱ्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात अनिल कांबळे व त्यांच्या मित्रांना कोयत्याचा धाक दाखवून २ मोबाईल, साडेपाचशे रुपये लुटल्याचा गुन्हा दाखल आहे. म्हणून पोलीस गटाऱ्याच्या शोधात होते. त्याला ताब्यात घेऊन, त्याच्याकडून दुचाकी (एमएच १७, एएक्स ४२१८), ११ हजार किंमतीचे २ मोबाईल, १०० रुपये किंमतीची कटावणी, एक दुचाकी तर कसारा येथून चोरलेली ऍक्टिव्ह असा एकूण १ लाख ६१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.