सप्तशृंगी घाटात आढळला युवकाचा मृतदेह !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगीगड हे या ठिकाणी एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.

शुक्रवारी (दि.११ डिसेंबर) रोजी सकाळी सप्तशृंगी गडावरील घाटातील सेल्फी पॉईंट येथे एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला. ही घटना ५ ते ६ दिवसांपूर्वी घडली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच मृत युवकाची ओळख पोलिसांना अद्याप पटलेली नाही. त्यामुळे पुढील तपासासाठी अडथळा येत आहे. ही घटना आत्महत्या की, हत्या की अपघात असे वेगवेगळे तर्क लावण्यात येत आहेत. सप्तशृंगी गड या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात.

त्यामुळे नेहमीच या ठिकाणी गर्दी असते, तसेच या परिसरात जंगल असल्याने असे प्रकार घडत असतात. यामुळे या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहेच, सोबत या घटनेच्या पार्श्वभूमीवर अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. पोलिसांकडून घटनेसंदर्भात अधिक तपास सुरु आहे.