सख्ख्या बहिणीनेच भावाच्या बॅंकेच्या लॉकरमधून परस्पर दागिने काढून घेतले

नाशिक (प्रतिनिधी): भावाने नाशिक मर्चंट को. ऑप. बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले दागिने सख्ख्या बहिणीनेच परस्पर काढून घेतल्याची घटना नाशिक शहरात घडली आहे. भावाच्या संमतीशिवाय हे दागिने परस्पर काढून घेतल्याने भावाने बहिणीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र भावाच्या लॉकर मधील दागिने बहिणीने कसे काढले हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.. कसे ते वाचाच..

शहराती म्हसरूळ भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने नाशिक मर्चंट को. ऑप. बॅंकेत संयुक्त नावाने लॉकरची सुविधा घेतली होती. या लॉकरमध्ये सोन्या चांदीचे दागिने ठेवले होते. व त्याची चावी विश्वासाने त्यांच्या सख्ख्या बहिणीकडे ठेवली होती. भावाने पोलिसांना दिलेल्या फिर्यादिप्रमाणे त्यांच्या बहिणीचा या दागिन्यांवर काहीएक हक्क नव्हता. असे असतांना बहिणीने भावाच्या संमतीशिवाय हे दागिने चावीचा वापर करून परस्पर काढून घेतले आणि विश्वासघात केला. यासंदर्भात पंचवटी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान ३७९, ४०३, आणि ४०६ प्रमाणे (गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९१/२०२०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणात फिर्यादी आणि आरोपी हे दोघे सख्खे बहिण भाऊ असल्यामुळे त्यांच्यातील अंतर्गत वाद लक्षात घेता नाशिक कॉलिंगने दोघांची नावे बातमीमध्ये न टाकणे योग्य समजले.