शेतात मृतावस्थेत आढळला बिबट्या ; दहा दिवसांत तीन बिबट्यांचा मृत्यू!

नाशिक (प्रतिनिधी) : आडगाव येथील एका शेतातील द्राक्षबागेत सात वर्षीय नर बिबट्या मृतावस्थेत काल (दि.१४) आढळून आला. वनविभागाकडून दर्शविलेल्या प्राथमिक अंदाजानुसार बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला असावा. तरी ठोस निदानाच्या पूर्ततेसाठी शवविच्छेदनानंतर व्हिसेरा मेरीच्या न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोशाळेत या बिबट्याचा मृतदेह पाठविण्यात आला आहे.

प्रभाकर माळोदे यांचे आडगाव येथील गट क्रमांक ११९९ शिवारात सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांना द्राक्षबागेत बिबट्या मृतावस्थेत दिसल्याने शेतकऱ्यांनी वनविभागाला याची माहिती दिली. वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक उत्तम पाटील, राजेंद्र ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन दखल घेतली. पथकाने मृतदेहाचा पंचनामा करत शवविच्छेदनासाठी मृतदेह अशोस्तंभाच्या दवाखान्यात हलविला. पशुधन विकास अधिकारी डॉ. वैशाली थोरात यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यांनी  दिलेल्या  माहितीनुसार बिबट्याच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव, विषबाधा व फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याचे आढळते. म्हणून बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हा प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे ठोस अहवालासाठी व्हिसेरा प्रयोगशाळेकडे रवाना करण्यात आला आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचे तीन मृत्यू झाले आहेत.