शिवभोजन थाळी गैरप्रकार! चौकशीची मागणी…

नाशिक (प्रतिनिधी) : गरीब तसेच गरजूंना कमी दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी तसेच महिला बचत गटांना व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली होती. नाशिकमध्ये शिवभोजन केंद्रासाठी नेमलेल्या जिल्हा समितीच्या दुर्लक्षामुळे शिवभोजन केंद्रात गैरकारभार होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याचे निवेदन राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियन कडून पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

राज्यातील गरिबांना नाममात्र दरात जेवण मिळावे यासाठी सरकारने शिवभोजन थाळी सुरु केली. हे शिवभोजन केंद्र महिला बचत गटांना चालवण्यासाठी देण्यात येते. परंतु याचे मालक आणि चालक वेगळे असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. तसेच कधीकधी महिला बचत गटांना डावलून खानावळींना तसेच हॉटेल व्यावसायिकांना हे शिवभोजन केंद्र चालवण्यासाठी दिले जाते. अशाही तक्रारी येत असल्याने यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.