व्हायरल इन्फेक्शन: नाशिकमध्ये सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले!

व्हायरल इन्फेक्शन: नाशिकमध्ये सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले

नाशिक (प्रतिनिधी): वातावरणातील बदलामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात खोकला, ताप, साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. शहरात सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहे. साथीचे आजारही बळावत आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्याय आले आहे.

बहुतांश घरांमध्ये या आजाराचे रुग्ण आहेत. काही दिवसांपासून पाऊस, ऊन आणि त्यानंतर थंडीचा जोर कमी-जास्त होत असून वातावरणात मोठ्या प्रमाणात गारव्यासह उष्णताही निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपूर्वी शहरात थंडी अचानक गायब झाली होती व वातावरण गरम व ऊबदार बनले होते.

त्यानंतरच्या काळात पाऊस सुरू झाल्याने थंडीनेही अचानक जोर घेतल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. घराघरांमध्ये सर्दी, खोकला व इतर तापसदृश आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. हे रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. शिवाय जुने नाशिक भागात डेंग्यू, चिकनगुन्या, टायफॉइड, मलेरियासदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.