विद्यापीठाने सुधारित निकाल लावल्याने विद्यार्थ्यांना दिलासा

नाशिक (प्रतिनिधी): सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परंतु,परीक्षा देतांना विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले  होते. परीक्षा झाल्यानंतर काही दिवसांमध्येच विद्यापीठाने निकाल लावले होते. मात्र वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाच्या बऱ्याच  विद्यार्थ्यांचे निकाल चुकीचे आले हे समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये खूप गोंधळ उडाला होता. काही विद्यार्थ्यांच्या निकालावर शून्य गुण आले होते तर, काही विद्यार्थी परीक्षेस उपस्थितच नव्हते असे आले होते.

या प्रकरणावर अखिल भारतीय परिषदेच्या विद्यार्थ्यांनी आवाज उठवला होता. हे आंदोलन पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्रासमोर झाले होते. त्यावेळी विद्यापीठाकडून तीन दिवसांत सुधारित निकाल लावले जातील असे सांगण्यात आले होते. आंदोलन करण्याआधी अभाविपकडून विद्यापीठाला एक निवेदन देण्यात आले होते परंतु त्यावर काही उत्तर न मिळाल्याने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या तीन दिवसांतच सुधारित निकाल लावण्यात आले.