वायुप्रदूषणमुक्त नाशिक करण्यासाठी महापालिकेला २० कोटींचे अनुदान !

नाशिक (प्रतिनिधी) : ज्या शहरांचे वायुप्रदूषण धोकादायक पातळीवर पोहचण्याची शक्यता आहे. अशा शहरांच्या वायुप्रदूषण मुक्तीसाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जात आहे. यामध्ये नाशिकचा देखील समावेश असून, तब्बल २० कोटी रुपये महापालिकेला देण्यात आले आहेत.

केंद्र शासनाकडून २०१३-१४ या वर्षांमध्ये देशातील प्रमुख शहरांच्या वायुप्रदूषणाचे मापन करण्यात आले. त्यानुसार २ वर्षांपूर्वी १७ शहरांची यादी जाहीर करण्यात आली, यामध्ये नाशिकचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील हवेचा पडताळा घेतला जात असून, याअंतर्गत गेल्या वर्षी एक समिती बनवण्यात आली. या समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष स्थानी महापालिकेचे आयुक्त आहेत. तर नाशिक महापालिकेला हवा सुधार कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश शासनाकडून दिले गेले होते. त्यानुसार समितीने आराखडा सादर केला. आराखडा मान्य झाल्यांनतर आता शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच वायुप्रदूषण मुक्त करण्यासाठी विविध उपाययोजनांकरिता २० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.