वाढत्या तीव्र थंडीने नाशिककरांना हुडहुडी कायम !

नाशिक (प्रतिनिधी) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नीचांक पातळी गाठून गायब झालेल्या थंडीने पुनरागमन करत थंडीचा चांगलाच कडाका लावला आहे. मागील ४ दिवसांपासून, नाशिकमध्ये वातावरणात थंडीचा गारठा जाणवतो आहे. त्यानुसार, किमान तापमानाचा पारा दररोज घसरत असून, सोमवारी दि. ७ डिसेंबर रोजी शहराचे किमान तापमान १०.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे.

या चालू आठवड्यात पारा ५ अंशापर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून दर्शविण्यात आली आहे. शुक्रवारी शहराचे वातावरण बदलण्यास सुरुवात झाली व शनिवारी सकाळी किमान तापमानाचा पारा घसरला. दरम्यान, शहरवाशी थंडीच्या तीव्रतेने गारठले. रविवारी पहाटे व संध्याकाळी नाशिककरांना थंडीच्या तीव्र तडाक्याचा अनुभव आला. तर, सोमवारी देखील सकाळी १० वाजेपर्यंत वातावरणात गारवा जाणवत होता. दिवाळीपासून गायब असलेल्या थंडीचा कहर आता नाशिकमध्ये दिवसेंदिवस वाढत चालला आहे.