वडाळा नाका : गॅस सिलिंडरचा स्फोट, एकाच कुटुंबातील ८ जण जखमी

नाशिक (प्रतिनिधी): वडाळा नाका परिसरातील सरजरीनगर, इगतपुरीचाळ येथील एका घरात शुक्रवारी (दि.२) रात्री ११ वाजेदरम्यान गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात पाच पुरुष व तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

सैय्यद लियाकत रहीम (वय 32), सैय्यद नुसरद रहीम (वय 25), रमजान वलीउल्ला अन्सारी (वय 22), सोयब वलीउल्ला अन्सारी (वय 28), आरिफ सलीम अत्तार (वय 53), नसरीन नुसरद सैय्यद (वय 25), सईदा शरफोद्दीन सैय्यद (वय 49), मुस्कान वलीउल्ला अन्सारी (वय 21) अशी जखमींची नावे आहेत.

हे ही वाचा:  नाशिक पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर कोयताधाऱ्यांचा धिंगाणा

पोलिसांच्या माहितीनुसार, सर्व कुटुंबीय घरात असताना अचानक रात्री 11 वाजेदरम्यान सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये आगीचा मोठा भडका उडाला.

अचानक लागलेल्या आगीमुळे झोपेत असलेले आठजण भाजले. यामध्ये सोयब अन्सारी, आरिफ अत्तार, नसरीन सैय्यद, सईदा सैय्यद आणि मुस्कान अन्सारी गंभीररित्या जखमी झाल्या. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचा भडका मोठा असल्यामुळे आग आटोक्यात आणणे कठीण झाले. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले.

हे ही वाचा:  नाशिकमध्ये सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला; सोमेश्वर धबधब्यात पडून युवतीचा मृत्यू

त्यांनी आग आटोक्यात आणली. जखमींना वेळेत उपचार मिळण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रिजवान नासीर शेख यांनी जखमींना अवघ्या अर्ध्या तासात जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आग कशामुळे लागली, याचा पोलीस शोध घेत आहेत.