लेखानगर परिसरात ट्रकने चिरडून ३ तरुणांचा जागीच मृत्यू !

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील लेखानगर परिसरात असलेल्या उड्डाणपुलावरून दुचाकीने जात असलेल्या तसेच मुंबईचे रहिवाशी असलेल्या मित्रांचा अपघात झाला. दरम्यान, एका अज्ञात ट्रक चालकाने अंगावरून वाहन चालविल्याने ३ तरुणांचा यामध्ये मृत्यू झाला. तर आणखी २ युवक या अपघातात गंभीर जखमी आहेत. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.३ जानेवारी) रोजी फिर्यादी निलेश नंदकिशोर धावडे (वय २२, रा.विलेपार्ले मुंबई) हे मित्र सिद्धार्थ भालेराव (वय २२) यांच्या दुचाकी (क्रमांक एमएच०२ ०६१०) वर प्रवास करत होते. तर, आशिष पाटोळे (वय १९) व अनिश वाकळे (वय १७) हे वैजनाथ चव्हाण (वय २१) यांच्या होंडा युनिकॉन दुचाकी (क्रमांक एमएच०२ एफडी ४२४८) वर प्रवास करत होते. दरम्यान, मुंबई आग्रा हायवे उड्डाण पुलावर बालभारती पाठ्यपुस्तक महामंडळ लेखानगर परिसरात वैजनाथ यांच्या गाडीला वाहनाचा धक्का लागला. त्यानंतर वैजनाथच्या गाडीचा धक्का सिद्धार्थच्या गाडीला लागल्याने सर्व मित्र गाडीवरून खाली पडले. दरम्यान, एका अज्ञात ट्रक चालकाने अविचाराने भरधाव वाहन चालवत, खाली पडलेल्या ४ मित्रांच्या अंगावर ट्रक चालवला. यानंतर ट्रक चालकाने घटनास्थळी न थांबता पोबारा केला. या अपघातात वैजनाथ, आशिष व सिद्धार्थ हे ३ तरुण जागीच ठार झाले तर, अनिश व निलेश हे गंभीर जखमी आहेत.

हे ही वाचा:  नाशिक हादरलं! तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून निर्घृण हत्या