लिफ्ट देणं पडलं महागात; लिफ्ट देणाऱ्यालाच लुटलं

लिफ्ट देणं पडलं महागात; लिफ्ट देणाऱ्यालाच लुटलं

नाशिक (प्रतिनिधी): लिफ्ट देणाऱ्या तरुणाला संशयितांनी मारहाण करत डोक्यात हातोडा मारुन ५० हजारांची रक्कम आणि मोबाईल लुटला. नाशिक-पुणे रोडवर शिंदेगाव येथे रात्री ९ वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी सराईत गुन्हेगार गोल्ड्या आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मद नबीहसन अन्सार (रा. वडाळागाव, मूळ रा. उत्तर प्रदेश) या तरुणाने तक्रार दिली. ते शिंदेगाव येथे मैत्रिणीसोबत जेवण करण्यास गेले होते. टोलनाक्यावर सराईत गुन्हेगार गोल्ड्या आणि त्याच्या दोन साथीदारांनी लिफ्ट मागितली. गाडी थोडी पुढे गेल्यावर संशयितांनी अन्सार यांना मारहाण व जखमी करत खिशातील सात हजार रुपये आणि मैत्रिणीचा मोबाइल हिसकावून घेतला. गाडीतून वडाळागावात घेऊन जात अन्सार यांचा मित्र अदनान याच्याकडून बळजबरीने ३० हजार रुपये काढून घेतले. संशयित गोल्ड्याच्या विरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यास तडीपार करण्यात आले आहे.