रेल्वेंच्या तांब्याच्या वायरी चोरणारी टोळके गजाआड!

प्रतिनिधी (नाशिक) : गेल्या काही दिवसांपासून कारशेडमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेच्या बोग्यांमधल्या किमती तांब्याच्या वायरींसह इतर मौल्यवान धातू चोरी होण्याच्या घटना समोर येत होत्या. इगतपुरी रेल्वे स्टेशन येथे तांब्याच्या वायरी आणि इतर वस्तू चोरी गेल्याने ४ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हेशाखा युनिट क्र. १ ने कौतुकास्पद कामगिरी करत काल (दि.१०) या चोरी करणाऱ्या टोळक्याला गजाआड केले आहे.

सोमवारी (दि.१०) रात्री ११ वाजेच्या सुमारास रेल्वेंच्या तांब्याच्या वायरींची चोरी करणारे टोळके बोलेरो (क्रमांक एमएच ४८ ए ९४५७) गाडीमध्ये बिटको पॉईंट येथे येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार रवींद्र बागुल यांना मिळाली. मिळालेल्या माहितीप्रमाणे गुन्हेशाखा युनिटने दोन पथके तयार करून सांगितलेल्या ठिकाणी जाऊन सापळा रचला. त्यावेळी सदर गाडी नाशिकरोड कडून बिटको पॉईंट कडे येतांना दिसली. पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता अमित अशोक मोरे (वय-२५, मूळ रा. खंबाळे, त्रंबकेश्वर, सध्या रा. खालची वाडी, सुभाषरोड, नाशिकरोड), गोरख लक्ष्मण भडांगे (वय-२२, रा. मूळ रा. खंबाळे, त्रंबकेश्वर, सध्या रा. खालची वाडी, सुभाषरोड, नाशिकरोड), गणेश रमेश सोळंके (वय-२३, मूळ रा. शिंदेगाव ग्रामपंचायत मागे, नाशिकरोड, सध्या रा. खालची वाडी, सुभाषरोड) अशी त्यांनी नावे सांगितली. त्यांची अधिक विचारपूस केली असता त्यांनी इगतपुरी रेल्वे स्टेशन यार्डात उभ्या असलेल्या रेल्वे बोगींच्या तांब्याच्या/ कॉपरच्या केबलची चार ते पाच वेळा चोरी केल्याचे कबुल केले.