रेमडेसीवीरची मागणी पाहता कितीही साठा आला तरी कमीच पडेल – जिल्हाधिकारी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात कोरोना रुग्णांची संख्या जसजशी वाढते आहे तसतशी रेमडेसीवीरची मागणीसुद्धा वाढते आहे. उपलब्ध साठा गरजू रुग्णापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हरतऱ्हेने प्रयत्न केले जात आहेत. परंतु काही वेळा जास्त प्रमाणात या रेमडेसीवीरची शिफारस केली जात आहे ती पाहता कितीही साठा आला तरी तो कमी पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे मत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी व्यक्त केले आहे.

जिल्हाधिकारी मांढरे यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.. ते म्हणतात, रेमडेसीवीरचा सध्या खूप तुटवडा जाणवत आहे. मागील वर्षी ज्यावेळेला रुग्ण संख्या बर्‍यापैकी वाढली होती त्यावेळी या औषधाचा इतका वापर झालेला नव्हता. या वर्षी जास्त रुग्ण संख्या  असली तरी मुळात यावेळी होत असलेला वापर संयुक्तिक आहे काय याबाबत काही वैद्यकीय तज्ञांनी यापूर्वीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे.

उपलब्ध साठा गरजू रुग्णापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हरतऱ्हेने प्रयत्न केले जात आहेत. परंतु काही वेळा जास्त प्रमाणात या रेमडेसीवीरची शिफारस केली जात आहे ती पाहता कितीही साठा आला तरी तो कमी पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे या औषधांची शिफारस योग्य प्रकारे केले जात आहे किंवा कसे हे डॉक्टरांनी जर काळजीपूर्वक तपासले तर ही अनावश्यक होणारी मागणी दूर होईल व योग्य त्या रुग्णांना पुरवठा करणे जिल्हा प्रशासनही शक्य होईल ही बाब इंडियन मेडिकल असोसिएशन हॉस्पिटल असोसिएशन यांच्या प्रतिनिधींच्या निदर्शनास जिल्हा प्रशासनाने यापूर्वी देखील आणून दिली होती.

त्याला प्रतिसाद म्हणून सोमवारी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रतिनिधींशी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये यावर असोसिएशनच्या वतीने सहकार्य  करण्याची तयारी दर्शवली गेली. त्यासाठी असोसिएशनने त्यांचे प्रतिनिधी निश्चित केलेले आहेत. असोसिएशन चे प्रतिनिधी वर नमूद बाबीं चा पाठपुरावा करतील तसेच डॉक्टरांचे प्रबोधनही करतील. औषधाच्या वापरासोबतच ऑक्सिजनच्या वापराबाबत देखील दिलेल्या मापदंडाप्रमाणे कार्यवाही होते आहे किंवा कसे या कडे सुद्धा लक्ष देण्यात येईल.

ऑक्सिजन अभावी उपचारांना खूप मोठ्या  प्रमाणात  मर्यादा येत आहेत त्यामुळे वापरावरील नियंत्रण सोबतच अधिक ऑक्सिजन पुरवठा तसेच रिमदेसिविरचा अधिक पुरवठा झाल्यास इतर गैरप्रकारांना आळा बसेल असे मत असोसिएशन तर्फे बैठकीत व्यक्त करण्यात आले.

नाशिक मधील समस्त रुग्णालये,  डॉक्टर, आरोग्य कर्मचारी नाशिककरांना कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि त्यासाठी आम्ही आमचे शंभर टक्के योगदान देत राहू. प्रशासनास पूर्ण सहकार्य करण्याचे आमचे धोरण राहील असे आश्वासन इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे देण्यात आले.

जिल्हा प्रशासनाची यंत्रणा व डॉक्टरांची यंत्रणा एकत्रितरीत्या या औषधांची शिफारस, वापर तसेच वितरण या सगळ्या बाबींवर लवकरच प्रभावी नियंत्रण आणतील.