रुग्णालयांनी रुग्णाला उपचारासाठी घेतले नाही, अखेर रिक्षातच मृत्यू !

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाने बाधित पत्नीवर एकीकडे रुग्णालयात उपचार सुरु असताना रविवारी मनपाच्या एका सफाई कर्मचाऱ्यास श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांच्या मुलीने त्यांना रुग्णालयात नेले. परंतु, सिडकोतील तीन रुग्णालयांच्या दारी जाऊन विनवण्या करुनही त्यांनी उपचारासाठी दाखल करुन न घेतल्याने अखेर रुग्णालयाबाहेर रिक्षातच या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. प्रयत्न करुनही वडिलांचे प्राण वाचवू न शकलेल्या मुलीने फोडलेला हंबरडा पाहून आजूबाजूला असलेल्या उपस्थितांचेही काळीज हेलावून गेले.

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने कोरोना महामारीच्या काळात सरकारी व खासगी रुग्णालयांनी कुठल्याही बाधित अथवा बाधित नसलेल्या रुग्णांना अहवालाची  प्रतीक्षा न करता त्याची लक्षणे बघून तत्काळ उपचारासाठी दाखल करून घेतले पाहिजे, असे राष्ट्रीय धोरण जाहीर केले आहे. परंतु, त्यास काही तास उलटत नाही तोच या नियमांचे सिडकोतील काही खासगी रुग्णालयांनी उल्लंघन केल्याने संताप व्यक्त होत आहे. कोरोनामुळे अनेक दुर्दैवी घटना समोर येत असताना सिडकोतील खासगी रुग्णालयांची मनमानी उघडकीस येत आहे.

सिडकोतील उदय कॉलनी, तोरणा नगर येथील नंदू सोनवणे (वय ५३) हे महापालिकेत सफाई कर्मचारी आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची पत्नी मनपाच्या बिटको रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहे. रविवारी पहाटे नंदू सोनवणे यांनाही अस्वस्थ वाटू लागले. सामाजिक कार्यकर्ते रिक्षाचालक भगवान मराठे मदतीला धाऊन आले. त्यांनी नंदू सोनवणे व त्यांच्या मुलीला रिक्षात बसवत लेखानगर येथील तीन खासगी रुग्णालयांमध्ये विनवण्या करून रुग्णास तपासण्याचा आग्रह केला. मात्र तीनही खासगी रुग्णालयांनी एकमेकांकडे बोट दाखवून त्या रुग्णालयात जाऊन तपासा म्हणून सांगितले.

दरम्यान, रुग्णाचा कोरोना अहवालही निगेटिव्ह आला. शेवटी ते जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. परंतु याच दरम्यान रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच रुग्णाने प्राण सोडला.