रिक्षाचालकाने लिफ़्ट देण्याचा बनाव करत पायी चालणाऱ्यास लुटले !

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील गंगापूर रोडवरील डिके नगर येथे पायी चालणाऱ्या व्यक्तीस रिक्षाचालकाने थांबवले. दरम्यान, लिफ़्ट देण्याचा बनाव करत, त्या व्यक्तीस मारहाण केली तसेच मोबाईल व रोकड घेऊन पोबारा केला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्युवेल सरोजअली अन्सारी (वय २७) हे गंगासागर कॉलनी सुयोजित गार्डन जवळ दत्त चौक या परिसरात राहतात. फिर्यादी १५ जानेवारी रोजी पावणे अकरा वाजेच्या सुमारास रात्री पायी जात होते. दरम्यान, डीके नगर परिसरात अज्ञात रिक्षाचालक व त्याचा साथीदार असे २ संशयित रिक्षातून फिर्यादीकडे आले. त्यानंतर, फिर्यादी यास तुला लिफ़्ट देतो असे सांगू लागले. मात्र, फिर्यादीने नकार दिला. दरम्यान, संशयितांनी फिर्यादीस मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच फिर्यादीच्या खिशातील १४ हजार ५०० रुपये रक्कम व मोबाईल असा एकूण १८ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन चोरटयांनी पोबारा केला.