राज्यासमोर रक्तसाठयाचे आव्हान ; पुढील ५ ते ७ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा!

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनामुळे राज्यासमोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. एक समस्या निस्तरते नाही तोच दुसरी समस्या डोकं वर काढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत पुढील ५ ते ७ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे.

कोरोना काळामध्ये नियमित होणारी रक्तदान शिबिरे बंद झाली. रक्तदानाचा महत्वाचा स्त्रोत असणारा युवावर्ग महाविद्यालये बंद असल्याने रक्तदान करू शकत नाही. तसेच अजुन इतरही कॉपोर्रेट ऑफिसेस वर्क फ्रॉम होम करीत असल्याने तोही एक मार्ग बंद झाल्याने रक्त संकलनामध्ये अडथळे येत आहेत. राज्यातील रक्त पेढ्यामधील रक्तसाठा कमी असल्याने रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

येणाऱ्या दिवसांमध्ये रक्तसाठा कमी पडून जास्त समस्या वाढू नये यासाठी राज्यातील सामाजिक, धार्मिक व गृह निर्माण सोसायट्यांनी रक्तदान शिबिरे राबवावी. व नागरिकांनी देखील आपल्या जवळच्या ठिकाणी रक्तदान करणे शक्य असल्यास ते करावे असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे