‘या’ आशयाच्या बातम्या चुकीच्या : निमा

नाशिक (प्रतिनिधी) : आयुष डॉक्टरांना अँलोपँथी चिकित्सा वापरण्याची परवानगी नाही, त्यामुळे या डॉक्टरांना कमी वेतन मान्य आहे, त्यामुळे त्यांना  खाजगी रुग्णालये, अतिदक्षता विभागांमध्ये आयुष डॉक्टरांना प्राधान्य दिले जात आहेत अशा आशयाच्या बातम्या काही दैनिकांमधून प्रसिद्ध झाल्या असून, यामुळे समाजात संभ्रम निर्माण होत आहे. म्हणून नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) अर्थात एन. आय.एम.ए (N.I.M.A)  संघटना पातळीवर स्पष्टीकरण देत आहे “अतिदक्षता विभागांमध्ये आयुष डॉक्टरांना प्राधान्य दिले जात आहे” ‘या’ आशयाच्या बातम्या चुकीच्या आहेत असे एन.आय.एम.ए (N.I.M.A)  नाशिक जिल्हा शाखेच्या अध्यक्षा डॉ. जयश्री सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.

भारतातील अनेक राज्यांमध्ये आयुष डॉक्टरांना अँलोपँथी चिकित्सा वापरण्याची परवानगी आहे. महाराष्ट्रात आयुर्वेद, युनानी पदवीधारकांना अँलोपँथी चिकित्सा वापरण्याची कायदेशीर मान्यता आहे. यासाठी महाराष्ट्र विधानसभेत त्या अनुषंगाने कायदा करण्यात आला आहे. माननीय सर्वाच्च न्यायालयाने याबाबत अतिशय सुस्पष्ट निकाल दिलेला आहे. महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 च्या अनुसूचीप्रमाणे जे आयुर्वेद पदवीधर A, A१, B, D  या शेड्युलमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना अँलोपँथी चिकित्सा देण्यास अनुमती आहे. प्रत्यक्षातही सरकारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, आत्ययिक सेवा(108 अँम्ब्युलन्स), मानसेवी वैद्यकीय अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था यासारख्या महत्वाच्या सरकारी आस्थापनांमध्ये बी.ए.एम्.एस डॉक्टरांना नियुक्ती दिली गेलेली आहे.

समान श्रेणी – समान वेतन या शासनाच्या कायद्यानुसार गेली अनेक वर्षापांसुन आयुष डॉक्टर त्यासाठी मागणी करत आहेत व शासन स्तरावर, संघटना स्तरावर त्यांचा सतत पाठपुरावा चालु आहे. तसेच एमबीबीएस डॉक्टरांच्या तुलनेत आयुष डॉक्टरांची संख्या अधिक आहे. अनेक ठिकाणी अगदी ग्रामिण स्तरापासुन, खाजगी व्यवसायातील फँमिली डॉक्टर ते आय.सी.यु पर्यत सर्वच स्तरांवर आयुष डॉक्टर आपली सेवा देत आहेत. अशा वेळी त्यांना दुय्यम समजण्याची चुक होऊ नये यासाठी हे स्पष्टीकरण देण्याची गरज निर्माण झाली आहे. सदर आशयाच्या बातम्यामुळे समजात संभ्रम निर्माण होत आहे. सोबतच डॉक्टरांची प्रतिमा दुषित होत आहे. त्यामुळेच गैरसमज दूर करण्यासाठी खुलासा सादर केला जात असल्याचेडॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.