याआधीही अनेक तक्रारी दाखल ; मात्र महापालिकेकडून दुर्लक्ष

नाशिक (प्रतिनिधी) : जुने नाशिक येथील झाकीर हुसेन रुग्णालयात महापालिकेच्या एका सफाई कर्मचाऱ्याने कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग केल्याचा घृणास्पद प्रकार मंगळवारी (दि.०८) घडला. त्यानंतर कोविड सेंटरमधील महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे. काल (दि.०९) भद्रकाली गुन्हे शोध पथकाने संशयितास अटक करण्यात आली.

दरम्यान संशयित आरोपी कैलास शिंदे याला तत्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी आमदार देवयानी फरांदे, महापौर सतीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली. याआधीसुद्धा संशयित कर्मचाऱ्यास महापालिका प्रशासनाकडून वारंवार समज देण्यात आलेली होती. मात्र हा कर्मचारी स्थानिक लोकप्रतिनिधीशी संबंधित असल्यामुळे त्याच्यावर कारवाई न करता त्याला समज देण्यात आली होती. या गोष्टींची माहिती प्रशासनाला असतांना सुद्धा या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.