यंदा महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या होणार ऑनलाइन निवडणुका!

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महापालिकेच्या सर्व विषय समित्यांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र आता त्या परत घेण्यात येणार आहेत. यंदा महापालिकेच्या निवडणुका या प्रथमच ऑनलाइन स्वरुपात घेण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून याबाबत तयारी सुरू आहे. सर्वप्रथम प्रभाग समित्यांचे सभापती निवडण्यात येणार आहेत. त्यासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्याबाबत महानगरपालिकेच्या वतीने बुधवारी (दि.१६) रोजी विभागीय आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे.

महापालिकेच्या प्रभाग समित्या पूर्व, पश्चिम, सिडको, सातपूर, पंचवटी आणि नाशिकरोड ह्या आहेत. मार्च महिन्यामध्ये प्रभाग समित्यांची मुदत संपली होती. मात्र, त्याच महिन्यात केंद्र आणि राज्य शासनाने कोरोना संकटामुळे लॉकडाऊन घोषित केले होते. राज्य शासनाच्या नगरविकास विभागानेदेखील स्वतंत्रपणे आदेश काढून कोरोनामुळे कोणत्याही निवडणुका घेतल्या जाणार नाही असे जाहीर केले होते.  प्रभाग समित्यांच्या सभापतींची मुदत संपल्यानंतर नवीन सभापतींची निवड रखडली होती. तसेच महानगरपालिकेतील शहर सुधार, महिला व बाल कल्याण,  आरोग्य व वैद्यकीय सहाय समिती, विधी या समित्यांची मुदतदेखील संपली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेल्या निवडणुका घेण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. राज्य शासनाने आता ऑनलाइन पद्धतीने निवडणूका घेण्याचे जाहीर केले आहे.

हे ही वाचा:  नाशिकमध्ये सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला; सोमेश्वर धबधब्यात पडून युवतीचा मृत्यू

प्रथम प्रभाग समित्यांच्या सभापतींच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी नगरसचिव राजू कुटे यांनी आयुक्तांना पत्र दिल्यानंतर त्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे सायंकाळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यासंबंधित पत्र पाठवण्यात आले आहे. महापालिकेच्या सर्व समित्यांच्या सभापती निवडीसाठी पीठासन अधिकारी, विभागीय आयुक्त किंवा त्यांनी प्राधीकृत केलेले अधिकारी असतात. त्यामुळे विभागीय आयुक्तच निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. सदर निवडणुकीचे मतदान ऑनलाइन असले तरी, अर्ज दाखल करणे आणि अन्य माघारीसाठी प्रत्यक्ष उमेदवारांची उपस्थिती आवश्यक असणार आहे. तसेच निवडणुकीच्या दिवशी उमेदवारांना प्रत्यक्ष प्रभाग समितीच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. मतदान प्रक्रियेचे संपूर्ण रेकॉर्डिंग केले जाणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: फोटो काढण्याच्या नादात पाय घसरून सोमेश्‍वर धबधब्यात पडल्याने युवतीचा मृत्यू