म्हणून… आता १०० टक्के प्रवासी क्षमतेने एसटी वाहतुकीला परवानगी!

नाशिक (प्रतिनिधी) : लॉकडाऊननंतर नियमांचे पालन करून एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांची परवानगी देऊन बससेवा पुन्हा सुरु करण्यात आली होती. एकाच मार्गावर धावणाऱ्या एसटीसाठी इंधन खरच आणि अधिक मनुष्यबळ लागत असल्याने आता १०० टक्के प्रवाशांसह वाहतूक करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली.

एकाच मार्गाच्या गाड्यांमध्ये ५० टक्केच प्रवाशांसाठी परवानगी असल्याने एसटीचा खरच वाढला होता. त्यामुळे १०० टक्के प्रवाशांना परवानगी द्यावी अशी मागणी एसटी महामंडळाने राज्य सरकारला केली होती. अशी वाहतूक करतांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून दोन आसनांच्या मध्ये पडदे लावण्याचा प्रस्ताव महामंडळाने मांडला. मात्र हा प्रस्ताव सरकारने नाकारला. बसमधील दोन आसनांमध्ये पडदे लावून प्रवास करणे योग्य वाटत नाही. त्यामुळे पडद्यांशिवाय वाहतूक करणे योग्य वाटत असल्याचे सरकारने स्पष्ट केले. त्यानंतर राज्य सरकारने अखेर एसटी वाहतूक पूर्ण क्षमतेने करण्यासाठी परवानगी दिली. म्हणून काल (दि.१८) पासून राज्यभरात एसटी पूर्ण क्षमतेने धावणार असल्याचे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.