मेडिकल चालकांचा कहर ; अव्वाच्या सव्वा भावाने मास्क विक्री

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने नागरिकांना मास्क लावणे बंधनकारक केले आहे. यामुळे शासनाकडून महाराष्ट्रामध्ये २ पदरी मास्क ३ रुपयांना तर ३ पदरी मास्क ४ रुपयांना तसेच एन-९५ मास्क १९ ते ४९ रुपयांना उपलबध करून देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे विक्रेत्यांना देखील या संदर्भात आदेश देण्यात आले आहेत. मात्र, शहरातील विक्रेत्यांकडून या आदेशाचे पालन होताना दिसत नाही. तर दुसऱ्या बाजूला नागरिकांमध्येही याबाबत गांभीर्य नाही.

शहरातील मेडिकल विक्रेत्यांकडून तसेच मास्क विक्रेत्यांकडून मास्कची विक्री अव्वाच्या सव्वा किमतीने केली जात आहे. तरी याबाबत स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील कॉलेजरोड परिसरात १९ ते ४९ रुपयांपर्यंतचा ए-९५ मास्क कुठेही मिळत नाही. तर १०० च्या पुढेच त्याची किंमत सांगितली जाते. शासनाच्या आदेशाची माहितीच ग्राहक व विक्रेत्यांना नसून सर्रास मास्कची विक्री जादा किमतीने सुरु आहे.

इंदिरानगर परिसरात ग्राहकांनी मागणी करून देखील विक्रेत्यांकडे ३ व ४ रुपयांचे मास्क मिळत नाहीत. अजून शासनाकडून ठरवून दिलेले मास्क विक्रीसाठी आलेच नसल्याचे सांगण्यात येते. भाभानगर परिसरात ‘यूज अँड थ्रो’ मास्क १० रुपयांना विकला जातो.  माधुरी पवार (सहाय्यक आयुक्त एफडीए) यांच्याकडून असे सांगण्यात येते की, विक्रेत्यांवर कारवाई करण्यापेक्षा जागृती व प्रबोधनावर भर दिला जात आहे. ३ व ४ रुपयांचे मास्क विक्रेत्यांकडे उपलबद्ध नसल्याने विक्रेत्यांकडे मास्कचे फलक व शासनाचे आदेश लावण्यात येत आहेत. तर सुज्ञ विक्रेत्यांकडून याबाबतीत अंमलबजावणी केली जात आहे.