मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशप्रक्रियेला अल्प प्रतिसाद!

प्रतिनिधी (नाशिक) : कोरोनाच्या विळख्यात सर्वच क्षेत्र अडकले असून, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या‌ प्रवेश प्रक्रियेला देखील त्याचा फटका बसला आहे. मागील चार वर्षात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ही तब्बल दीड लाखाने कमी झाली आहे. दरवर्षी जून महिन्यात मुक्त विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरू होते. मात्र, यंदा कोरोनामुळे लॉकडाउन घोषित केले होते. त्यामुळे जुलै महिन्यात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. तरी देखील मुदतवाढ करत १५ ऑक्टोंबरपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे.

अन्य विद्यापीठांच्या तुलनेत मुक्त विद्यापीठाकडून कमी प्रमाणात फी आकारली जाते. परंतु, सध्या कोरोनाचे आर्थिक संकट ओढवले आहे. तरी विद्यार्थ्यांकडून फी भरण्याची क्षमता नसल्याचे सांगण्यात येत आहे. नोकरी तसेच व्यवसाय करत असताना अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी मुक्त विद्यापीठाचा सहारा विद्यार्थ्यांकडून घेण्यात येतो. मात्र, कोरोनामुळे अनेकांना बेरोजगारीला सामोरे जावे लागले आहे. अशा परिस्थितीत प्रवेशासाठी लागणारी फी आणायची कुठून असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा आहे. दरवर्षी ६ लाखांच्या वर असणारी विद्यार्थी प्रवेश संख्या यंदा मात्र, साडेचार लाखांचा टप्पा ही पार करू शकलेली नाही. तर दुसऱ्याबाजूला महाविद्यालयीन अशैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे देखील मुक्त विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेवर पडसाद उमटत आहेत.कारण या संपामध्ये मुक्त विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचा समावेश‌ जरी नसला.तरी,राज्यातील अन्य महाविद्यालयांमध्ये मुक्त विद्यापीठाची केंद्रे आहेत.कारण मुक्त विद्यापीठामध्ये संपूर्ण राज्यातून विद्यार्थी प्रवेश घेतात.त्यामुळे कुठल्याही राज्यात नैसर्गिक आपत्ती किंवा इतर अडथळा आल्यास त्या भागातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होतो.