मास्कचा दंड कमी करण्यास मनपा आयुक्तांचा नकार

नाशिक (प्रतिनिधी): मास्क न वापरणारे आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या थुंकीबहाद्दरांवर एक हजार रुपयांचा दंड करणे जाचक असल्याचा दावा करत हा दंड कमी करण्याची सूचना स्थायी समितीने दिली असली तरी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी त्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी एक हजार रुपये प्रती व्यक्ती याचप्रमाणे दंड आकारणी केली असून १८३ नागरिकांकडून एकूण १ लाख ८३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे गेल्या रविवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शासकीय यंत्रणांच्या घेतलेल्या बैठकीत मास्क न वापरणार्यांवर कठोर कारवाई म्हणून दंडाची रक्कम दोनशे रुपयांवर एक हजार रुपये करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी साथ रोग प्रतिबंधक कायद्याच्या अन्वये अधिसूचना काढून एक हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद केली.