मारहाण प्रकरणी न्यायालयाने एकास ३ वर्ष कारावासाची शिक्षा

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील पंचवटी परिसरात २०१८ मध्ये एकाने विनाकारण एका इसमास मारहाण केली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटल्याचा निकाल १८ जानेवारी २०२१ रोजी लागला असून, आरोपीस ३ वर्ष कारावास व ५ हजार ५०० रुपये दंड सुनावण्यात आला आहे.

सदरचा गुन्हा ६ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास पंचवटी अमरधाम येथे घडला होता. दरम्यान, फिर्यादी यांचा भाऊ दुर्योधन रामचंद्र कोंगे (रा.गीताईनगर,टाकळी) हा पायी जात असतांना आरोपी विशाल गगनसिंग रावत (रा.रामटेकडी, तपोवन पंचवटी) याने विनाकारण मारहाण केली. यामध्ये त्याने कोंगे याला लाथा बुक्यांनी मारहाण केली तर, त्याच्याजवळील फायटरने नाकावर व दोन्ही भुवयांजवळ तसेच डोक्यास मारून नाकाचे हाड फ़ॅक्चर करून जखमी केले होते. या झटापटीत फिर्यादीच्या भावाच्या खिशातील १० हजार रुपये देखील गहाळ झाले होते. यामुळे पंचवटी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक  ए.एम.सरोदे यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून, मुख्य न्यायदंडाधिकारी नाशिक येथे दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्याची सुनावणी १८ जानेवारी २०२१ रोजी झाली असून, आरोपीस ३ वर्ष कारावास व ५ हजार ५०० रुपये दंड सुनावण्यात आला आहे.