मानसिक छळ होत असल्यानेच ‘त्या’ गरोदर महिलेची आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील महाराष्ट्र पोलीस अकादमीमधील कर्मचारी वसाहतीत एका महिलेने १७ जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. त्यानुसार, महिलेच्या परिवाराकडून तिला आत्महत्या करण्यास तिच्या सासरच्या मंडळींनी प्रवृत्त केले असे सांगण्यात येत आहे. तर, तिचा छळ देखील  करण्यात येत होता. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मयत सौ.पल्लवी प्रमोद गायकवाड हिचा तिच्या सासरच्या मंडळींकडून दि.२६ जुलै २०२० ते १७ जानेवारी २०२१ या कालावधी दरम्यान, वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. यामध्ये मयत महिलेचा पती प्रमोद गायकवाड (वय ३४), सासू मीना दिलीप गायकवाड (वय ५५) व नणंद नूतन दिलीप गायकवाड (वय २७) यांच्याकडून महिलेस सतत मारहाण व शिवीगाळ करण्यात येत होती. तसेच महिलेच्या वडिलांनी हुंडा जास्त दिला नाही म्हणून, घर व चारचाकी वाहनाची मागणी करून तिला वारंवार त्रास दिला जात होता. सदर महिला साडे पाच महिन्याची गरोदर होती. मात्र, तिला सतत त्रास देऊन सासरच्या मंडळींनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. म्हणून, मयत महिलेच्या वडिलांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी देखील तपास करून संशयितांना तातडीने १८ जानेवारी रोजी अटक केली आहे.