मानवी वस्तीत सात फुटी अजगर ; घटना सातपूर परिसरातली….

नाशिक (प्रतिनिधी ) :  शनिवारी  (दि.०७) रात्रीच्या सुमारास सातपूरमधील महादेव वाडी परिसरात अजगर आढळून आल्याचा प्रकार घडला. या परिसरातील नाल्यालगत असलेल्या रस्त्यावर अंदाजे २० किलो वजनाचा आणि सात ते आठ फूट लांब अजगर वेटोळे घालून बसलेला आढळून आला. हा अजगर पाहण्यासाठी स्थनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

याबाबत माहिती मिळताच वनविभागाच्या गस्त पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सर्पमित्राच्या मदतीने अजगराला सुरक्षित रेस्क्यू करून त्रंबकेश्वरच्या वन क्षेत्रात सोडण्यात आले. यापूर्वी देखील शहर परिसरात अजगर आढळून आल्याच्या घटना घडल्या आहेत असे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच या भागात अजगराचा अधिवास असू शकतो असे वन विभागाने स्पष्ट केले. दुपारच्या सुमारास झालेल्या पावसामुळे जवळील नदी-नाल्यामधील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने वाट चुकवीत हा अजगर आला असल्याचा अंदाज वन विभागाने दर्शवला आहे.