“माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेचा नाशकात शुभारंभ

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील कोरोना परिस्थिती पुर्ण नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला जास्तीत जास्त सहकार्य करावे जेणे करून नाशिकच्या भूमीतून कोरोना हद्दपार होईल असा विश्वास महापौर सतीश कुलकर्णी यांनी केले. राज्य शासनाने सुरू केलेल्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी”च्या माध्यमातून कोविड मुक्त योजनेच्या शुभारंभा मुख्य कार्यक्रम नाशिक पूर्व विभागाच्या कार्यालयात झाला. या मोहिमेचा शुभारंभ प्रातिनिधिक स्वरूपात पथकांना थर्मल गन सारख्या वस्तूंचे किट देऊन करण्यात आला.

या कार्यक्रमात बोलतांना महापौर सतीश कुलकर्णी म्हणाले, की शहरातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मनपा प्रशासकीय कडून युद्ध पातळीवर काम सुरु असून मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यात नागरिकांनी प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन केले. पुढे ते म्हणाले की, या महामारीवर मात करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी नागरिकांना प्रबोधन करत आहेत परंतु अजूनही नागरिकांकडून सहकार्य मिळत नाही ते मिळावे यासाठी नागरिकांनी स्वतःहून प्रयत्न करुन प्रशासनाला मदत करावी.

यावेळी आयुक्त कैलास जाधव म्हणाले की कोरोनावर जोपर्यंत लस किंवा औषध बाजारामध्ये येत नाही तोपर्यंत नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे. जेणेकरून या महामारीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ती मदत होईल. ते पुढे म्हणाले की प्रशासन सर्व स्तरावर काम करत असून नागरिकांनी देखील प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केले पाहिजे. जेणेकरून कोरोना सारख्या संकटातून आपण सर्वांना बाहेर पडता येईल प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन नागरिकांनी  सहकार्य केल्यास संकटावर निश्चित मात करता येईल व सर्वांना यातून दिलासा मिळेल. सर्वजण या संकटातून बाहेर निघतील असा विश्वास महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी व्यक्त केला.