महिलांना अश्लील व्हिडिओ, फोटो पाठवणारा डॉक्टर अटकेत

नाशिक (प्रतिनिधी): पतीचे मद्याचे व्यसन सोडवण्यासाठी संपर्कात असलेल्या महिलांना अश्लील व्हिडिओ, फोटो पाठवणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. २५) सायबर पोलिसांनी औरंगाबाद येथील फुलंब्रीमध्ये ही कारवाई केली. डॉ. अमोल किसन जाधव असे या संशयित डॉक्टरचे नाव आहे. एक वर्षापासून हा संशयित फरार होता.

याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर पोलिस ठाण्यात २०२० मध्ये एका महिलेच्या तक्रारीनुसार संशयित डॉ. अमोल जाधव हा दारू सोडवणे आणि मानसोपचार केंद्र चालवत होता.

दारू सोडण्यासाठी त्याने सोशल मीडियावर जाहिरात दिली होती. या माध्यमातून संपर्कात आलेल्या महिलांना मोबाइलवर संपर्क साधून त्यांच्याशी अश्लील बोलणे, अश्लील व्हिडिओ आणि फोटो पाठवत होता. तक्रार दाखल झाल्यानंतर संशयित क्लिनिक बंद करून फरार झाला होता. एक वर्ष तो पोलिसांना चकवा देत होता. अखेर तंत्रविश्लेषण शाखेच्या मदतीने माग काढत संशयिताला अटक केली.