महापालिकेच्या चाचणी तपासात रेल्वेस्थानकावर आढळले २१ कोरोना संशयित !

नाशिक (प्रतिनिधी) : महापालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून नाशिकरोड रेल्वेस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दरम्यान गुरुवारी सायंकाळपर्यंत ६८० प्रवाशांचे स्क्रीनिंग केले असता, कोरोनाचे २१ संशयित रुग्ण आढळून आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमित धावणाऱ्या रेल्वे बंद असून, फक्त कोविड स्पेशल व फेस्टिव्हल स्पेशल गाड्या सुरु आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशानुसार, प्रवाशांकडे आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक आहे. अहवाल नसल्यास संबंधित रेल्वेस्थानकावर स्क्रीनिंग व इतर चाचण्या घेतल्या जात आहेत. रेल्वेस्थानकावर गुरुवारी (दि.२६ नोव्हेंबर) रोजी  महापालिकेने ३ वैद्यकीय पथके नेमली असून, येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. तपासणी दरम्यान कोरोना रुग्ण आढळल्यास त्याला बिटको रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली आहे. रेल्वेस्थानकावर येण्यासाठी व जाण्यासाठी प्रवाशांकरीता एकच प्रवेशद्वार सुरु ठेवला आहे. दरम्यान स्थानकाचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात येत असून, प्रवाशांचे प्रथम स्क्रीनिंग केले जाते.