वाळू लिलावांची संख्या वाढवून महसूल वाढीवर भर द्यावा : राधाकृष्ण गमे

नाशिक (प्रतिनिधी) : यावर्षी नदीत पाणी असल्याने वाळू साठ्याचा अंदाज घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. परंतु अशा परिस्थितीत पारंपारिक पद्धतीचा वापर करुन वाळू लिलावाची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच नाशिक विभागाला जमीन व गौण खनिज महसुल उत्पन्नाचे 728 कोटींचे उद्दीष्टे देण्यात आले आहे. त्यामुळे विभागातील नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार येथील जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत वाळू लिलावांची सख्या वाढवून महसूल वाढीवर भर द्यावा, असे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती कक्षात पाचही जिल्ह्यांचा आढावा दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आला. त्यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे बोलत होते. विभागीय आयुक्त गमे म्हणाले, कोरोना काळात महसूल विभागाचा उत्पन्नाच्या कामांवर परिणाम झाला होता. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून सर्व महसूल अधिकाऱ्यांनी महसुलाच्या वसूलीवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. पर्यावरण समितीकडे गेलेल्या वाळू लिलावाबाबतच्या प्रस्तावांचा पाठपुरावा करुन प्रकरणे मार्गी लावावीत. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरुन सर्व तालुक्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांना वाळू लिलावाबाबत साप्ताहिक आढावा बैठक घेण्याची सूचना करावी, असेही गमे यांनी यावेळी सांगितले.