भोंदू बाबाच्या आश्रमाचा पोलिसांनी केला भांडाफोड !

नाशिक (प्रतिनिधी): बाबा, बुवाबाजी सारख्या अंधश्रद्धांवरील लोकांचा विश्वास अजुनही कमी होत नाही. त्याचाच फायदा काही लोक घेत असतात. भोळ्याभाबड्या लोकांच्या अंगावर चाबकाने फटके मारून, बनावटी सोन्याच्या विटा दाखवून लाखो रुपयांची लूट करणाऱ्या बाबाला पोलिसांनी नुकतेच पकडले आहे.

 ‘बडे बाबा उर्फ पाथर्डीवाला’ या संशयित व्यक्तीचे नाव गणेश जयराम जगताप (३७) असून याने वडाळा- पाथर्डी रस्त्यावर आलिशान आश्रम बांधून या भोंदूने नाशिकसह औरंगाबाद, लातूर मधील लोकांना लाखो रुपयांना फसवल्याचे समोर आले. एवढेच नाही तर लोकांना श्रध्दॆच्या नावाखाली पेटत्या निखाऱ्यावर चालवणे, देवांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून पैसा उकळणे, सप्ताह बसवणे किंवा वेगवेगळे आश्वासने देऊन लोकांना भरीस पाडणे यासारखे उद्योग हा भोंदू बाबा करायचा. एवढेच नाही तर माझ्या बड्या व्यक्तीनंसोबत ओळखी असून मी तुमच्या मुलांना नोकरी लावून देतो, जमिनीतून सोने काढतो, स्वतःमध्ये दैवशक्ती असल्याचे हा व्यक्ती लोकांना सांगायचा.

या बाबाने वेगवेगळ्या जिल्ह्यामधे साखळी तयार करून ठेवली आहे. याने सामान्य माणसेच नाही तर मोठमोठ्या उद्योजकांना देखील गळाला लावले होते. या बाबाची सखोल चौकशी करून त्याचे साम्राज्य मुळासकट उखडून टाकण्याचे आव्हाहन पोलिसांसमोर आहे. अंधश्रद्धानिर्मूलन समितीने पोलिसांकडे या बाबावर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे निवेदन दिले आहे.