भुसावळ-पुणेदरम्यान आठ डब्यांची विशेष मेमू रेल्वे

भुसावळ-पुणेदरम्यान आठ डब्यांची विशेष मेमू रेल्वे प्रायोगिक तत्वावर सुरु करण्याचा विचार आहे..

नाशिक (प्रतिनिधी): मध्य रेल्वेतर्फे भुसावळ-पुणेदरम्यान विशेष मेमू एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे. मनमाड, दौंडमार्गे ती चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षी मार्चपर्यंत ही गाडी सुरू होती. मात्र, लॉकडाऊनमुळे ती बंद पडली होती. आता प्रायोगिक तत्त्वावर ती पुन्हा दोन दिवसासाठी चालविण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक ०११३५ अप भुसावळ-पुणे गुरुवारी (दि. १५) आणि २९ एप्रिलला भुसावळहून सकाळी ६.१५ वाजता सुटेल. त्याच दिवशी सायंकाळी ४:४५ वाजता पुणे येथे पोहोचेल. जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड हे थांबे असतील. गाडी क्रमांक ०११३६ डाऊन पुणे-भुसावळ विशेष एक्स्प्रेस शुक्रवारी (दि. १६) आणि ३० एप्रिलला पुण्याहून सकाळी साडेअकराला सुटेल. त्याच दिवशी रात्री पावणेनऊ वाजता भुसावळ येथे पोहोचेल. या मेमू ट्रेनमध्ये आठ आरक्षित सिटिंग कोच असतील. पूर्णतः राखीव असलेल्या विशेष गाड्यांचे बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू आहे. फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्य स्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.