भांडणाचा बनाव करत, पायी चालणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल चोरला !

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील मेनरोड ते शालिमारकडे पायी चालणाऱ्या व्यक्तीसमोर अचानक २ इसम येऊन भांडू लागले. दरम्यान, एका इसमाने धक्का देत, पायी चालणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल घेऊन पळ काढला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी नरेश बुलखीराम शहा (वय ५२, रा.देववाडा हुंडीवाला लेन, भद्रकाली नाशिक) हे मेनरोड कडून शालिमारकडे पायी जात होते. दरम्यान, शनिवारी (दि.२ जानेवारी) रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास अविनाश मेडिकलसमोर २ अनोळखी इसम फिर्यादींच्या पुढे येऊन, भांडण करू लागले. दरम्यान, हे इसम एकमेकांना धरून ओढू लागले व यांच्यातील एक इसम फिर्यादींना येऊन धडकला. त्यावेळी तो इसम फिर्यादींच्या खिशाला हात लावू लागला. यामुळे शहा शालिमारच्या दिशेने पळू लागले. दरम्यान, संशयित इसमाने फिर्यादींच्या मागे पळत येऊन, त्यांना धक्का देऊन खाली पाडले. यामध्ये फिर्यादी यांचा सॅमसंग कंपनीचा १० हजार किमतीचा मोबाईल खाली पडला. तो मोबाईल घेऊन इसमाने पळ काढला.