भरधाव दुचाकीच्या धडकेत पायी चालणारा व्यक्ती ठार….

नाशिक (प्रतिनिधी) : शहरामध्ये इंदिरानगर परिसरातील पाथर्डीगाव सर्कलजवळ एका दुचाकीने जोरदार धडक दिल्याने अपघात घडला. या घटनेत पायी चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने, महामार्गावरील भरधाव वेगाने दुचाकी चालवणाऱ्यांमुळे धोका वाढला आहे.

सुरज हरिप्रसाद (वय ४० रा.पाथर्डीगाव, मूळ रा.कटनी, मध्य प्रदेश) हे मंगळवारी (दि.२४ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सर्कलजवळून गावाकडे पायी जात होते. दरम्यान  भरधाव दुचाकीने (क्र.एमएच१५ एपी३४९३) हरिप्रसाद यांना जोरदार धडक दिली. यावेळी अपघात झाल्यानंतर दुचाकी चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. या धडकेत हरिप्रसाद खंबीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी दुचाकीच्या क्रमांकावरून संबंधित दुचाकी चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.