बिबट्याला धाडशी झुंज देत पळवून लावले एका चिमुकल्याने!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामधील सोनारी गाव येथील काळुंगे वस्तीतील शेतात एक चिमुकला काम करत होता. मात्र, अचानक बिबट्याने हल्ल्या करत गौरव नामक चिमुकल्याचा उजवा हात जबड्यात पकडला. पण गौरवने धाडस दाखवत बिबट्याच्या या हल्ल्याचा प्रतिकार करून त्याला पळवून लावले. यामुळे गौरवच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

नाशिक जिल्ह्यातील सोनारी या छोट्याश्या गावात संजय काळुंगे कुटुंबीय राहते. मंगळवारी (दि.३ नोव्हेंबर) रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मक्याच्या शेतात कामे सुरु होती. शाळेला सुट्ट्या असल्याने गौरव काळुंगे देखील कुटुंबासोबत शेतातच काम करत होता. दरम्यान अचानक बिबट्या गौरवसमोर येऊन उभा राहिला. व हल्ला करत बिबट्याने गौवाचा उजवा हात जबड्यात पकडला. सुरुवातीला गौरव घाबरला पण प्रसंगावधान दाखवत त्याने बिबट्याच्या मानेला डाव्या हाताने जोरात बुक्के मारले. यामुळे बिबट्याची पकड सैल होऊन तो पळून गेला. गौरवच्या या झुंजीला अखेर यश आले.

मुलाच्या ओरडण्याचा आवाज एकूण, वडील संजय , काका, गावचे पोलीसपाटील चंद्रभान पाटील व आजूबाजूचे शेतमजूर धावून आले. त्यावेळी गौरवाचा रक्ताने माखलेला हात बघून सर्वे भेदरले.  दरम्यान गौरवला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. उपचार करून त्याला बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला. या घटनेची दाखल घेत सिन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे व वनपाल यांनी त्वरित बुधवारी सोनारी येथे संबंधित भागात पिंजरा लावला.