बंद होण्याच्या मार्गावर असलेला एकलहरे प्रकल्प वीजनिर्मितीसाठी पुन्हा सुरू….

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकची वीज महाग पडते, म्हणून महावितरण वीज खरेदी करत नव्हते. मात्र,१२ ऑक्टोबरला मुंबईत पाॅवरग्रीडमध्ये अचानक बिघाड झाल्याने, सरकारला नाशिकच्या प्रकल्पाचे महत्त्व कळले. यामुळे गेल्या ८  महिन्यांपासून बंद असलेले नाशिकचे एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रातील एक युनिट गुरुवारी (दि.१५) रोजी मध्यरात्रीपासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले आहे.

२५ मार्च पासून एकलहरे येथील संच बंद होते. त्यामुळे कोराडी, परळी, भुसावळ ‌या केंद्रांना झीरो शेड्यूल दिले होते. त्यामुळे तेथील वीजनिर्मिती बंद होती. हळूहळू लॉकडाउन शिथिल करण्यात येत असून, काही उद्योगधंदे सुरू झाल्याने नाशिक सोडून इतर वीज केंद्रे सुरू झाली. म्हणून नाशिकचे वीज केंद्र कायमस्वरूपी बंद होते की, काय अशी भीती येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाटत होती. मात्र, प्रकल्प परत सुरू झाल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. बाभळेश्वर वीज वाहिनीवरील भार नियंत्रित करण्यासाठी त्वरित एकलहरे येथील वीज केंद्रातील कोणताही एक संच सुरू करण्यात यावा. असे आदेश बुधवारी सायंकाळी देण्यात आले. त्याअंतर्गत गुरुवारी २१० मेगावॉट क्षमतेचा युनिट नंबर ४ चा संच सुरू करण्यात आला. मुख्य अभियंता मोहन आव्हाड याने तातडीने सर्व विभागप्रमुखांना जबाबदारी सोपवून कार्य सुरु करण्याच्या सूचना दिल्या.